फोंडाघाट घोणसरी नावळे रस्त्याची दुरावस्था ; पीडब्ल्यूडी कडून खड्डे बुजविण्याचा मुलामा

रस्ता नूतनीकरण न केल्यास प्रजासत्ताकदिनी आंदोलनाचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट घोणसरी कुर्ली नावळे रस्त्याची पूर्ण दैनावस्था झाली आहे. सातत्याने या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करून मजबुतीकरण करण्याची मागणी करूनही पीडब्ल्यूडी कडून केवळ तकलादूपणे खड्डे बुजविण्याचा मुलामा केला जात आहे. या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम थांबवून खडीकरण, डांबरीकरण, बी.बी.एम. कार्पेट करून रस्ता मजबुतीकरण न केल्यास 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर घोणसरी गावातील ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून सरपंच प्रसाद राणे यांनी दिला आहे. याबाबत चे निवेदन सरपंच प्रसाद राणे यांनी उपअभियंता श्रीनिवास बासूतकर यांना दिले आहे. यावेळी भाजपा कार्यकर्ता मिहीर मिलिंद मराठे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, करूळ नावळे, कुर्ली घोणसरी, फोंडाघाट या प्रजिमा 6 रस्त्याचे 3 वर्षांपूर्वी खडीकरण डांबरीकरण बावीचे भाटले मालडीकर घरापर्यंत करण्यात आले होते पिंपरी चा उतार ते झेंगटी चा ओहोळ पर्यंत चा मार्ग पूर्णतः नादुरुस्त झाला आहे. बहुतांश मोऱ्या निकामी झाल्या असून गटार अभावी रस्ता नादुरुस्त झाला आहे. तात्पुरती खड्डे बुजविण्याची कामे करून रस्ता नूतनीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अति नादुरुस्त झालेल्या या रस्त्याची पाहणी घोणसरी सरपंचांसह पीडब्ल्यूडी च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करून रस्ता नूतनीकरण बाबत प्रस्ताव करावा.खड्डेमय रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून तात्काळ नादुरुस्त मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम थांबवून बी बी एम कार्पेट करण्यात यावे. अन्यथा येत्या प्रजासत्ताकदिनी घोणसरी ग्रामस्थांसह कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे.

error: Content is protected !!