कणकवली (प्रतिनिधी) : राजे प्रतिष्ठान सिंधू व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर १ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब, लाठी–काठी व धनुर्विद्या या पारंपरिक खेळांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते ११.०० या वेळेत संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेस जिल्हा शिक्षण विभागाच्या जिल्हा समन्वयक स्मिता नलावडे, केंद्रप्रमुख सूर्यकांत चव्हाण (बोर्डवे), सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, शाळा व्यवस्थापन समिती ओसरगाव नंबर १ चे अध्यक्ष जीवबा अपराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमात CISF चे निवृत्त अधिकारी बाळकृष्ण कवळे हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मविश्वास तसेच भारतीय परंपरेशी नाते जोडणारे हे खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यशाळेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब व मुख्याध्यापक किशोर कदम यांनी केले आहे. राजे प्रतिष्ठान सिंधू ही संस्था जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असून बालकुमार साहित्य संमेलन, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करत आहे. कोरोना काळातही संस्थेने समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
पारंपरिक खेळांना अधिक प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना जिल्हा व राज्यस्तरीय संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात शौर्य, शिस्त व संस्कार रुजवणारा प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.












