प्रशालेच्या वाहतुक सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाच्या वतीने पालकमंत्र्यांचे वेधले होते लक्ष
पालकमंत्री नितेश राणे यांनी गतीरोधकांची योग्य जाडी व संख्या वाढविण्या संदर्भात बांधकाम विभागाला दिले होते आदेश
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील अर्जुन रावराणे विद्यालय परिसरात तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालय अशा सर्व शासकीय इमारती असल्याने सदर शालेय परिसरात प्रशालेचे विद्यार्थी व नागरिकांची वाढती रहदारी व महामार्गावर असलेले रंबल स्ट्रीप्स गतीरोधक यांची संख्या व जाडी पुरेशी नाही त्यामुळे वाहनांचा वेग सदर शालेय परिसरात कमी होत नाही. ही बाब लक्षात घेऊन संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक भास्कर नादकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाच्या वतीने तालुका समादेशक मंदार चोरगे, आर.एस.पी.अधिकारी संगीता पाटील यांच्या सह प्रशालेचे एन.सी.सी. ऑफीसर संदेश तुळसणकर, प्रशालेचे शिक्षक योगेंद्र चव्हाण यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती सदर बाब लक्षात घेऊन तातडीने शालेय परीसरातील महामार्गावर दुतर्फा व शालेय प्रवेशद्वारासमोर योग्य जाडीच्या रंबल स्ट्रीप्स गतीरोधकांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज वैभववाडीतील अर्जुन रावराणे विद्यालय परिसरातील महामार्गावर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपकार्यकारी अभियंता वृषाली पाटील, सहाय्यक अभियंता पवन पाटील, अभियंता संकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित योग्य जाडीच्या रंबल स्ट्रीप्स गतीरोधकांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे पालक व नागरिकांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.













