चोरट्यांचे चोरी करतानाचे सी. सी. टी.व्ही फुटेज पोलिसांच्या हाती
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील धुरीभाटले या एकाच वाडीतील बंद स्थितीत असलेली एकूण ६ घरे अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घरफोडीची घटना ही मंगळवार पहाटे दि.०९ जून २०२६ रोजी पावणे तीनच्या सुमारास घडली असल्याचे समजते. तर या चोरी प्रकरणातील सी.सी.टीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांनी आपली तपास यंत्रणा तातडीने सुरू केली असल्याचे समजते. याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण पासून अगदी जवळ असलेले व मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नडगिवे या गावात शेर्पे – नडगिवे रोडवरील धुरीभाटले वाडी ही अनेक घरे असलेली मोठी लोकसंख्येची वाडी असून बरेचसे ग्रामस्थ आपल्या नोकरी धंद्या निमित्त मुंबई येथे राहत असल्यामुळे त्यांची घरे बंद आहेत आणि याचाच फायदा घेत चोरट्यांनी येथील ६ बंद असलेली घरे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी नेमक्या घरातील कोणत्या वस्तू चोरल्या आहेत. हे घर मालक मुंबई वरून आल्यानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान नडगिवे धुरीभाटले वाडी येथील आर.सी.सी बंगले असलेली पक्की घरे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असल्याचे ग्रामस्थांच्या मंगळवारी सकाळी ७ नंतर निदर्शन आले. यामध्ये घरमालक – मोहन सखाराम मण्यार, सेवानिवृत्त BSNL कर्मचारी यांचे” संध्या” नाव असलेले घर चोरट्यांनी फोडले असून” द्रौपदी पांडुरंग निवास” हे संदीप पांडुरंग मांजरेकर यांच्या मालकीचे घर, “आई वडिलांची सावली” हे भास्कर शंकर राणे यांच्या मालकीचे घर, तसेच “सौ वंदना ” रवींद्र वासुदेव मांजरेकर यांचे घर व शंकर सीताराम आंबेरकर यांचे घर देखील फोडण्यात आले असून “सदा स्मृती ” हे अमोल सदाशिव मयेकर यांचे घर चोरट्यांनी फोडल्याचे सकाळी ७.०० नंतर ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. गावचे पोलिस पाटील जितेंद्र मण्यार यांनी या घटनेची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस स्टेशन चे पोलिस अधिकारी मिलिंद देसाई यांनी नडगिवे धुरीभाटले गावाला तातडीची भेट देऊन घरफोडी झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली. व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन घरफोडी घटनेचा पंचनामा केला. तर खारेपाटण परिसरात होत असलेल्या चोरीच्या घटना व घरफोडीचे प्रकार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या समोर या घर फोडी चोरीतील चोरट्यांना शोधून काढणे आता एक आव्हान बनले आहे. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण व कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस करीत आहेत.
दरम्यान नडगिवे धुरीभाटले येथे घडलेल्या घरफोडी चोरी प्रकारात मिळालेल्या सी. सी. टी. व्हि फुटेज नुसार एकूण ६ पुरुष चोरटे हे तोडला रुमाल बांधून व हातात ग्लोज घालून मध्य रात्रीचे आल्याचे दिसत असून त्यांच्याकडे दुचाकी वाहन असल्याचे दिसते.त्यामुळे ही एक मोठी चोरट्यांची टोळी असल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे यापुढे बंद असलेल्या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर नडगिवे येथे फोडण्यात आलेल्या घराचे मुख्य दरवाजे तोडण्यात आले असून काही घरात प्रवेश करून घरातील कपाटे देखील फोडण्यात आली आहेत. तर घरातील सामान इतरत्र फेकून दिल्याचे दिसत आहे. बंद घरांचे गेट तोडून तसेच घराच्या कड्या कोयंडा तोडून चोरट्यांनी अक्षरश नडगिवे गावात धुमाकुळ घातला असून याबाबत गावचे माजी सरपंच अमित मांजरेकर उपसरपंच भावेश कर्ले यांनी घरफोडी चोरीतील चोरट्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे.















