ॲमेच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय..
पुणे (प्रतिनिधी) : अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र (AKFM) ची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथील साई चेंबर्स, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही सभा नुकतीच प्रसिद्ध उद्योगपती तथा एकेएफएम( अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र) चे कार्यकारीअध्यक्ष पुनित बालन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी सरचिटणीस भारतीय जगताप, उपाध्यक्ष विजय संतान, कल्याणकुमार गुजराती, खजिनदार बाळासाहेब जाधव, सहसचिव ज्ञानेश काळे, गोकुळ तांदळे, अजय देशमुख,राजकुमार राऊत, राज्य कार्यकारणी सदस्य जगजीत खुराना, अशोक देवकर, श्रीकांत पराडकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा.डॉ.बी.पी.रोंगे,सुनिल जाधव आदीं मान्यवर पदाधिकारी सभेला उपस्थित होते.याशिवाय राज्यभरातील जिल्हा पदाधिकारी आणि कबड्डी संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे अध्यक्षस्थान कार्यकारी अध्यक्ष पुनीत बालन यांनी भूषविले. यावेळी राज्यातील कबड्डीच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली तसेच वार्षिक अहवाल आणि आर्थिक आढाव्याचे सादरीकरण करण्यात आले.
सभेत आगामी महाराष्ट्र प्रीमियर कबड्डी लीग राज्यातील स्पर्धांचे नियोजन, विविध समित्यांच्या नियुक्त्या, लेखापरीक्षकांची निवड तसेच २०२६-२७ या वर्षासाठीच्या क्रीडा दिनदर्शिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय निर्णयांनाही सभेत मंजुरी देण्यात आली.
याच बैठकीत राज्यातील कबड्डी पंचांची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी दि १० व ११ जून २०२६ रोजी पंढरपूर येथे राज्यस्तरीय पंच कार्यशाळा व पंच परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या दोन दिवसीय उपक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पंच सहभागी होणार असून, त्यांना कबड्डीच्या अद्ययावत नियमावली, तांत्रिक बाबी, सामन्यांचे व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया आणि राष्ट्रीय स्तरावरील नियमांतील बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेनंतर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन पात्र पंचांची गुणवत्ता निश्चित करण्यात येणार असून, राज्यातील पंचगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सभेत नमूद करण्यात आले.
कबड्डीचा दर्जा उंचावण्यासाठी समन्वयाने कार्य करावे – पुनित बालन
अध्यक्षीय भाषणात पुनीत बालन यांनी महाराष्ट्रातील कबड्डीचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व जिल्हा संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सरचिटणीस भारती जगताप यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून संघटनेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. सभेच्या शेवटी उपस्थितांनी महाराष्ट्रात कबड्डी संस्कृती अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सभेला राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.सभेचे प्रास्ताविक विजय संतान यांनी तर सूत्रसंचलन ज्ञानेश काळे व आभार अशोक सरोदे मानले. या सभेला महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












