सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : चुलत भावासह त्याच्या पत्नीवर तलवारी ने जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यात आरोपी हरिश्चंद्र उर्फ संदीप आत्माराम परब ( रा. वराड, ता. मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस.टी. त्रिपाठी यांनी फेटाळला आहे. सलग दुसऱ्यांदा आरोपी संदीप याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी संदीप परब आणि फिर्यादी संतोष रमेश परब (मूळ रा वराड, सध्या रा. भांडुप वेस्ट ) हे चुलत भाऊ आहेत. आरोपी संदीप परब याला फिर्यादी संतोष परब यांनी घराच्या माळ्याचे काम करण्यासाठी रक्कम दिली होती. मात्र संदीप ने काम पूर्ण केले नव्हते. तसेच काम पूर्ण करण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली होती. फिर्यादी संतोष हे वराड येथे आले असता त्यांचा विहिरीवरील मोटर पाण्याचा पाईप आरोपी संदीप ने 19 एप्रिल 2026 रोजी कापला. त्यावरून झालेल्या वादानंतर आरोपी संदीप याने आपल्या राहत्या घरातून तलवार आणून साक्षीदार राजेंद्र परब यांच्या छातीवर वार केला. तसेच फिर्यादी संतोष यांची पत्नी लता हिच्या डोक्यावर तलवारीचा वार लागून ती जखमी झाली. तसेच साक्षीदार जितेंद्र आंगणे व संतोष परब यांनाही दुखापत केली. याबाबत संतोष परब यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप परब विरोधात गुन्हा दाखल करून त्याला 22 एप्रिल 2026 रोजी मालवण पोलिसांनी अटक केली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संदीप याने दुसऱ्यांदा जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायाधीशांच्या निदर्शनास आणले. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे, फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला आहे, आरोपी आणि फिर्यादी यांची घरे समोरासमोर असून आरोपी जामीनमुक्त झाल्यास पुन्हा गुन्हा करू शकतो, गुन्ह्यातील वापरलेली तलवार आरोपीने त्याच्या घरातून आणली यावरून आरोपीचा खुनशी स्वभाव आणि वृत्ती दिसून येते,या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून जामीनमुक्त झाल्यास आरोपी संदीप हा साक्षीदार व पंच यांच्यावर दबाव आणेल ज्यामुळे साक्षीदार व पंच साक्ष देण्यास पुढे येणार नाहीत. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी संदीप चा जामीन फेटाळण्यासाठी केलेला बिनतोड युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्री. त्रिपाठी यांनी आरोपी संदीप चा जामीन अर्ज नामंजूर केला.












