बौद्ध समाजाच्या तथागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्ज वितरण सेवेचा प्रारंभ
खारेपाटण (प्रतिनिधी) : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात बौद्ध समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तथागत नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली असून संस्थेच्या एकूण उत्कर्षात ठेवीदार सभासदा बरोबरच संस्थेच्या कर्जदार सभासदाचा देखील वाटा अधिक महत्त्वाचा असतो.”असे भावपूर्ण उदगार संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी जिल्ह्यात संस्थेचे नव्याने स्थापन झालेल्या बौद्ध समाज बांधवांच्या तथागत नागरी पतसंस्थेच्या कणकवली येथील शाखा कार्यालयात सभासद कर्ज वितरण कार्यक्रमात बोलताना काढले.
शनिवारी कणकवली येथील मुख्य शाखेत हा उपक्रम पार पडला. यावेळी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील कदम यांनी आलेल्या एकूण कर्ज मागणी अर्जदारांची माहिती संचालकांना दिली. त्यानुसार संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्या हस्ते कर्ज वितरणाचे चेक कर्जदार सभासदांना वितरीत करून संस्थेच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सूर्यकांत कदम यांनी पतसंस्थेचा उद्देश सांगून पतसंस्था कर्ज दारावरच मोठी होत असते. त्यासाठी कर्जदार सभासदांनी नियमित हप्ते भरणे आवश्यक असल्याचे सांगून तुम्ही कर्जदार असाल तरीही बँकेचे हिस्सेदार आहात याचे भान ठेवा आणि नियमित हप्ते भरा आणि पतपेढी नावारूपाला आणा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी सभासदांना केले. पतसंस्थेचा पाया हा कर्जदार आहे असे सांगून पतसंस्थेचे विविध उपक्रम त्याने स्पष्ट केले. कोणालाही फोन अथवा तुमच्या दारात येण्याची पाळी आमच्यावर आणू नका असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
यावेळी तज्ञ संचालक प्रमोद कासले, संचालक मोहन जाधव, मिलिंद सर्पे, श्रद्धा कदम, के एस कदम, रूपाली पेंडूरकर, सिद्धार्थ कदम, कांता जाधव आदी प्रमुख संचालक उपस्थित होते. तसेच कर्जदार व संघटनेचे पदाधिकारी पी के कदम, प्रकाश कदम, सुहास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.












