खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र तथा या गावचे माजी सरपंच तसेच कणकवली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत शंकर उर्फ कांता आप्पा शेट्ये राहणार शिवाजी पेठ खारेपाटण यांचे आज मंगळवार ४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
कांता आप्पा शेट्ये या टोपण नावाने संपूर्ण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात परिचित असलेले सूर्यकांत शेट्ये हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते.तर त्यांचे विविध राजकीय पक्षाच्या नेत्याशी जवळचे संबंध होते. त्यांनी खारेपाटण सरपंच , कणकवली तालुका पंचायत समितीचे सभापती व उपसभापती याबरोबरच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच खारेपाटण येथील प प्पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी संस्थेचे अध्यक्ष आदी विविध पदांवर काम करत त्यांनी आपला वेगळा ठसा जनमानसात उमठविला होता.
पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती व्हायच्या अगोदर स्वतंत्र खारेपाटण तालुका निर्माण व्हावा म्हणून जनआंदोलन करणारे कांता आपा शेट्ये हे तत्कालीन लढवय्या कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली,जावई ,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.तर कांता आप्पा शेट्ये यांच्या दुःखद निधनाची बातमी खारेपाटण येथे समजताच प.पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले.तर गावात सर्वत्र शोक व्यक्त करण्यात आला.












