सुदैवाने चालक आणि प्रवासी बचावले -बसचे मोठे नुकसान
चौके धामापूर मार्गावर चौकेपासून काही अंतरावर झाला अपघात
चौके (प्रतिनिधी) : कुडाळ येथून मालवणच्या दिशेने येणारी कुडाळ – मालवण एसटी बस चौके येथे येत असताना आणि त्याचं वेळी चौके वरून धामापूरच्या दिशेने जाणारा डंपर यांच्यात चौके नारायण वाडी या ठिकाणी आज मंगळवार दिनांक २० रोजी दुपारी समोरासमोर जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक व प्रवासी सुदैवाने बचावले मात्र एसटी बसच्या चालकाच्या बाजूने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान मालवण डेपोची एसटी बस (M H -14 BT -3063) मंगळवारी दुपारी कुडाळ वरून मालवणच्या दिशेला येत असताना चौके नारायण वाडी येथे एसटी बस आणि चौके वरून धामापुरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर (MH-07- AJ -2810) यांच्यामध्ये एसटी चालकाच्या बाजूने जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. बसमधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या. मात्र झालेल्या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. बसचालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवण एसटी आगारात दिली असून एसटी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे.












