मालवण बसस्थानक नूतन इमारतीचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

प्रवासी व पर्यटक यांना दर्जेदार सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील : बसस्थानक इमारतीच्या वरील मजल्यावर मॉल उभारणीही होणार

मालवण (प्रतिनिधी) : पर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आले आहे. प्रवासी व पर्यटक यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या दृष्टीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या बरोबरच अधिक सेवा सुविधांच्या दृष्टीने ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यासाठी आपण नेहमी एसटी प्रशासनासोबत आहोत. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण बस स्थानक नूतन इमारत लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.

दरम्यान, बसस्थानक कामाचा आमदार निलेश राणे सातत्याने आढावा घेत होते. प्रशासन तसेच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु ठेवला. दोन महिन्यांपूर्वी पुन्हा आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली. प्रवासी वर्गाच्या सोईच्या दृष्टीने काही सूचना केल्या. त्यानुसार काम होऊन नवीन इमारत प्रवासी सेवेत दाखल झाली आहे. याठिकाणी अधिकाधिक सेवा प्रवासी, पर्यटक यांना देण्याच्या दृष्टीने आमदार निलेश राणे प्रयत्नाशील आहेत. एक देखणी वास्तू उभी राहिली आहे. असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील मालवण बस स्थानक पुनःबांधणी कामाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हापरिषद प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, एसटीविभाग मुंबई प्रदेश स्थापत्य कार्यकारी अभियंत्या मीनल सोनवणे, प्रभारी विभाग नियंत्रक सुजित डोंगरे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, उपअभियंता पांडुरंग पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाख, विभागीय स्थापत्या अभियंता अक्षय टेंकरे, विभागीय लेखाधिकारी सुवर्णा दळवी, मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजन वराडकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, माजी जिप सभापती संतोष साटविलकर, दादा नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, निशय पालेकर, भाऊ मोरजे, महिला पदाधिकारी सोनाली पाटकर, अंजना सामंत यासह अन्य महायुतीचे पदाधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

बसस्थानक जुनी इमारत 45 वर्ष पुर्ण झाली. काही ठिकाणी पडझड होत होती. याचा विचार करता नवी इमारत उभारणी करण्यात आली. त्यानंतर जुनी इमारत जमीनदोस्त करून नव्या इमारतीचे लोकार्पण होत आहे. सुमारे 3 कोटी 12 लाख प्रशासकीय मान्यतेतून हे काम पुर्ण झाले असून सुसज्ज इमारत पुर्ण झाली आहे.

मॉल उभारणी होणार : आ. निलेश राणे

मालवण बस स्थानकाच्या वरच्या मजल्यावर मॉल उभारणी केली जाणार आहे. या माध्यमातूनही प्रवासी व पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे. आमचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!