महावितरणाचा स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचा अट्टाहास वीज ग्राहकांचा तीव्र विरोध

फोंडाघाट परिसरातील वीज ग्राहक व ग्रामपंचायतीचे महावितरणला पत्र अन्यथा आंदोलनाचा इशारा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या महावितरण कडून फोंडाघाट पंचक्रोशीच्या आजूबाजूच्या गावात, वीज ग्राहकांना विश्वासात न घेता, जुने मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जात आहेत. या अनुषंगाने फोंडाघाट वीजधारकांनी एकत्र येत, स्मार्ट प्रीपेड मीटर अमान्य असल्याचे महाराष्ट्र वीज संघटनेचा नमुना अर्ज,कार्यकारी अभियंता बिजलीनगर – कणकवली व दुय्यम अभियंता मराविम यांचेकडे सुपूर्त केले आहेत. तसेच फोंडाघाट मधील वीजधारकांचा या नवीन मीटर बसवण्याला तीव्र विरोध असून, जुनेच मीटर कायम ठेवावेत असे कार्यकारी अभियंत्यांना तारीख १५ जून २५ च्या पत्राने ग्रामपंचायतीने निदर्शनास आणून दिले आहे..

पंचक्रोशीतील बहुतांश वीज ग्राहक स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याला विरोध असल्याचा अर्ज करीत आहेत.यावर ग्रामपंचायतीला कार्यकारी अभियंता कणकवली यांनी पत्र पाठवून, मीटर बदलण्याचे टेंडर AMISP एजन्सीला व्यवस्थापकीय संचालक महावितरण कडून आढावा बैठकीमध्ये देण्यात आल्याचे कळविले आहे. केवळ ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी हा प्रपंच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे…

या पत्रांनी स्मार्ट प्रीपेड मीटर बाबत वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जुने मीटर व्यवस्थित असताना, ग्राहकांना विश्वासात न घेता, स्मार्ट प्रीपेड मीटरचा बसविण्याचा महावितरणाचा ” हम करेसो कायदा SSS” अट्टाहास का ? असा संतप्त सवाल वीज ग्राहकांकडून विचारला जात आहे. नव्या मीटरला तीव्र विरोध होत आहे, याबाबत सर्व वीजधारकांकडून पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले जाणार आहे. तरी फोंडाघाट मध्ये ग्राहकांना विश्वासात घेऊन जुने मीटर कायम ठेवावेत अशी आग्रही मागणी होत आहे…

error: Content is protected !!