वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या व्हॅगनार कंपनीच्या चारचाकी गाडीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली आहे.
रणजीत तावडे यांचे वैभववाडी बाजारपेठेत चायनीज सेंटर आहे. सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आपला व्यवसाय बंद करून घरी गेले. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांनी घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला आपली व्हॅगनार गाडी उभी केली होती.त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ घरी आला असता गाडी सुस्थितीत होती. मात्र मंगळवारी सकाळी नळकामगारांच्या निदर्शनास गाडीची मागील काच फोडलेली आढळली. त्यांनी तात्काळ याची माहिती तावडे यांना दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात रीतसर तक्रार दाखल केली.
याबाबत बोलताना रणजीत तावडे म्हणाले, “आपले कोणाशीही राजकीय वैमनस्य नाही. तरीदेखील अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करून शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे.”
तसेच, परिसरातील खासगी घरांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही पोलिसांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या चारचाकीची तोडफोड.











