तळेरे बस स्थानकातील दुरुस्तीच्या कामांना अखेर वेग
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे बस स्थानकाची गेली अनेक वर्षे दुरावस्था झाली होती. स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती, तसेच स्वच्छतागृहांचीही अत्यंत दयनीय अवस्था होती. या समस्यांकडे सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर आणि तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी सातत्याने लक्ष वेधले होते. याबाबत अस्मिता तळेकर यांनी सोशल मीडियावरूनही स्थानकाच्या दुरावस्थेची व्यथा मांडली होती. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही यासंदर्भातील माहिती पोहोचवली होती. त्यानंतर मंत्री सरनाईक यांनी तातडीने तळेरे बस स्थानकाच्या स्थितीचा आढावा घेत संबंधित प्रशासनाला दुरुस्ती व नव्या बांधकामाबाबत आवश्यक सूचना दिल्या. तर तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनीही लेखी स्वरूपात एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. अस्मिता तळेकर यांनी थेट परिवहन मंत्र्यांकडे या स्थानकामधील विविध सोई सुविधेबाबत सत्यस्थिती मांडली. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हालचाल करत स्थानकातील कामांना सुरुवात केली आहे. सध्या स्वच्छतागृह, पाणपोई तसेच अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना वेग आला असून प्रवासी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, या कामांच्या श्रेयावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगू लागली असली तरी नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धावती भेट या बस स्थानकाला असणार असल्याचीही चर्चा रंगत आहे.


छायाचित्र :
- तळेरे बसस्थानकामधील पुरुष व महिला स्वच्छतागृहांची झालेली अवस्था दिसत आहे.
- तळेरे बसस्थानकामधील पुरुष व महिला स्वच्छतागृहातील सांडपाणी असे उघड्यावर सोडलेले होते.









