खारेपाटण (प्रतिनिधी) : मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये आज गुरुवार दि.४ जून २०२६ रोजी खारेपाटण ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण गावातील परिसराची श्रमदानातून स्वच्छता मोहीम स.७ ते १० या वेळेत राबविण्यात आली.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सदस्या प्राची ईसवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्वच्छता मोहिमे करीता नोडल अधिकारी म्हणून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक के एस वानोळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर स्वच्छता मोहिमेत खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर प्रा.आ.केंद्र खारेपाटण च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता.
खारेपाटण रामेश्वर नगर बस थांबा परिसर ते अवेरा पूल पर्यंत महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेला प्लास्टिक कचरा यावेळी श्रमदानातून कर्मचारी व लोकप्रतिनिधि वर्गाने साफ सफाई करून व गोळा केला व ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविली. यावेळी सुमारे २ टन एवढा प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर तो जाळून त्याची योग्य रित्या विल्हेवाट लावण्यात आली. “आपले गाव स्वच्छ हरित व सुंदर गाव करायचे असेल किंवा ही संकल्पना गावात राबविण्यासाठी गावातील नागरिकांनी अशा शासनाच्या उपक्रमाची वाट न पाहता आपला परिसर आपण स्वतः स्वच्छ ठेवावा व ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून पर्यावरणाचा समतोल राखावा.” असे आवाहन जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांनी यावेळी नागरिकांना केले.















