आठवडा बाजारासाठी आलेल्या नागरीकांची उडाली धांदल
कणकवली (प्रतिनिधी) : मान्सूनपूर्व पावसाने सायंकाळच्या सुमारास कणकवली शहरात जोरदार धुमाकूळ घातला. ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाने आपले उग्र रुप दाखविले. आज दिवसभर वातावरण ढगाळ होते. त्यामुळे उष्णतेचे प्रमाणही वाढले होते. संध्याकाळच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने बाजारासाठी आलेल्या लोकांची धांदल उडविली. कणकवली शहरात तसेच परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वार्यासह पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कणकवली शहरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
वीज पुरवठा देखील खंडीत झाला. होता .अवकाळी पावसाने दाणादाण करून सोडली. गेल्या दोन तीन दिवसांपासून कणकवली तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अधूनमधून पाऊस पडत असताना मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. कणकवलीचा आठवडा बाजार असल्याने नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती मात्र अचानक पाऊस दाखल झाल्याने बाजारासाठी आलेल्यांची धांदल उडाली.












