जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांची बदली

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकपदी मोहन दहिकर

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून ठाणे शहराचे पोलीस उप आयुक्त मोहन दहीकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी मोहन दहिकर हे ठाणे शहर पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. ते सध्या ठाणे शहर पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध पोलीस विभागात काम केले आहे, ज्यात पोलीस अधीक्षक म्हणून महामार्ग सुरक्षा ठाणे आणि दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांचा समावेश होतो.

सौरभ अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदाचा २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पदभार स्वीकारला होता. अडिज वर्ष त्यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. गेल्या अडीज वर्षात त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. पोलीस आणि ग्रामीण जनता यांची नाळ जोडण्यासाठी तसेच कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी त्यांनी सुरू केलेला ग्राम संवाद हा उपक्रम अधिक लोकप्रिय ठरला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्याला मोठा प्रतिसाद लाभला. त्यांनी ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी मदत करण्याकरिता सुरू केलेले उपक्रम दिलासादायक ठरले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम घेतले. ज्येष्ठ नागरिक मदत कक्ष सर्व पोलीस ठाण्यात सुरू करून त्यावर जातीनिशी लक्ष ठेवले होते.

सिंधुदुर्ग पोलिसांची वेबसाईट अद्यावत करीत त्यात नवनवीन माहिती अपलोड केली आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी नंबर, त्यांचे फोटो, तसेच पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी पर्यटन स्थळांची माहिती, यात देण्याचे काम केले. महिला सेल सक्षमतेने कार्यरत करून पीडित महिलांना तत्काळ मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या शिवाय जिल्ह्यात घुसखोरी करू पाहत असलेल्या ड्रग्ज विरोधी मोहीम तीव्र केली. या अवैद्य व्यवसायाचा बीमोड करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच मागील दहा ते पंधरा वर्षातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा इतिहास इतकासा चांगला नव्हता. परंतु अग्रवाल यांच्या काळात झालेल्या लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या होत्या. त्यामुळे या चांगल्या कामाचे फळ राज्य शासनाने दिले असल्याचे पुणे गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती देवून दिले असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!