कारवाई न केल्यास ग्रामस्थांसह आंदोलनाचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तिवरे गावात राजरोसपणे गोवा बनावटीची अवैध दारूविक्री जोरात सुरू असून याला पोलिसांचा कृपाशीर्वाद असल्याचा आरोप तिवरे गावचे सरपंच भाई आंबेलकर यांनी केला आहे. हा अवैध दारूविक्री अड्डा बंद न केल्यास तिवरे ग्रामस्थांसह कणकवली पोलिसांविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच भाई आंबेलकर यांनी दिला आहे. याबाबत बोलताना भाई आंबेलकर म्हणाले की तिवरे गावात गेली कित्येक वर्षे खुलेआम अवैध दारूविक्री केली जात आहे. हा दारूविक्रेता संबंधित यंत्रणेला दरमहा हफ्ते पुरवत असून त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करणे पोलीस टाळत आहेत. जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा केवळ थातुरमातुर कारवाई करून पोलीस आपण कारवाई केल्याचे दाखवतात.मात्र पोलिसांची पाठ फिरली की पुन्हा लगेच अवैध दारूविक्री पुन्हा जोमाने सुरू होते. ह्या अवैध दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार बरबाद झाले असून काहींचा मृत्यूही झाला आहे.मात्र पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत. या अवैध दारूविक्रेत्यावर हद्दपारी चाही प्रस्ताव प्रलंबित असून जर पोलिसांनी तिवरे गावातील सुरू असलेली अवैध दारूविक्री विरोधात कडक कारवाई केली नाही तर ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा तिवरे सरपंच भाई आंबेलकर यांनी दिला आहे.












