चौके (प्रतिनिधी) : काळसे – माळकेवाडी येथील श्री कुळस्वामी मंदिराचा ३० वा वर्धापन दिन १६ ते १९ मे या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. श्री देव भद्रेश्वर पालखी मिरवणूक आणि माळकेवाडीतील सर्व स्थानिक कलाकारांनी सादर केलेले शिमगा खेळावर आधारीत नाविण्यपूर्ण स्किट नाट्य प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.
सोमवार दिनांक १९ मे रोजी रात्री कुळस्वामी मंदिर परिसरात दीपोत्सव झाल्यानंतर, संगीतकार वसंतराव गोसावी सभागृहात विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळावर नव्याने अध्यक्ष म्हणून निवडून आलेले श्री. विनोद गोसावी, उपाध्यक्ष श्री. योगेश राऊळ, सहसचिव श्री. शरद गोसावी आणि संचालक श्री. कमलेश गोसावी यांचा श्री कुळस्वामी सेवा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले माळकेवाडीतील रहिवाशी श्री. विलास नाईक, आणि जादूगार क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे पुणे व ओडीसा येथे नावलौकिक मिळविणारे जादूगार पप्पीकुमार यांचाही मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे सल्लागार व मार्गदर्शक, श्री विनोद गोसावी, मंडळाचे अध्यक्ष दिनानाथ नाईक, सचिव विलास नाईक, खजिनदार धाकुजी नाईक, सदस्य अशोक नाईक, माधव नाईक, जादूगार पप्पीकुमार, मार्गदर्शक रामभाऊ नाईक, माई कांडरकर, केशव नाईक, घन:श्याम नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर, पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाटयप्रयोग सादर होऊन कुळस्वामी महोत्सवाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष, दिनानाथ नाईक यांनी केले.












