वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या धुवाधार पावसाचा फटका करूळ व भुईबावडा घाटाला बसत आहे. करूळ घाटात शुक्रवारी पहाटे गगनबावड्यापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या यु आकाराच्या वळणावर दरड पडल्यामुळे घाटातील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. दरम्यान या घाटातील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळवण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसिबिच्या साहायने दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरु केली आहे. तर भुईबावडा घाटात सुद्धा दगड माती रस्त्यावर येत आहे. मात्र वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरु आहे.
भुईबावडा घाटात छोटया मोठया दरडी कोसळत असून यामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. गुरुवारी सायंकाळी भुईबावडा घाटात दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसिबीच्या साहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरु केली. तर करूळ घाटातही पडझडं झाली होती मात्र वाहतूक सुरु होती. गुरुवारी सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी पहाटे पुन्हा गगनबावड्यापासून दोन किमी अंतरावर यू आकाराच्या वळणाजवळ मोठी दरड रस्तावर पडली होती. त्यामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली होती. घाटातील ठेकेदाराने दरड हटवून सकाळी ९ वाजल्यापासून वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली आहे…












