चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील गुरामवाड येथील मूळ रहिवासी अशोक कृष्णा तळवडेकर (वय 65) सध्या राहणार आंबेरी- तेलीवाडी यांचा मृतदेह बुधवारी सकाळी चौके संम्यक नगर स्मशानभूमी नजीक दिसून आला. याबाबत चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर यांनी मालवण पोलीस ठाणे येथे माहिती दिली. मयत अशोक तळवडेकर गेली काही वर्ष आंबेरी येथील आपल्या नातेवाईकांकडे मुलासोबत राहत होते. मध्ये कधीतरी ते कट्टा गुरमावाड येथेही आपल्या घरी जात. सोमवारी आंबेरी येथून ते गुरामवाड येथे जाण्यासाठी घरातून निघाले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आली. मात्र बुधवारी सकाळी काहींना चौके सम्यक नगर जवळील स्मशानभूमी नजीक एक मृतदेह ग्रामस्थांना दिसून आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्यांच्या मुलाला याची माहिती देण्यात आली. खात्री करण्यात आली. अशोक तळवडेकर यांची पत्नी व दोन मुलगे मुंबईला राहतात त्यांनाही माहिती देण्यात आली.
मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल डी. जानकर यांनी घटनास्थळी येत मृतदेहाचा पंचनामा केला. चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुबेर मिठारी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. आकस्मिक मृत्यू प्रकरणी पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत.












