केंद्रशाळेत अतिसार प्रबोधन संपन्न
चार राजा मित्रपरिवारातर्फे फोंडाघाट केंद्रशाळेत मोफत वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशावेळी पालक आणि पाल्याने दक्ष राहून काळजी घेतली तर आपल्याला लागण होणार नाही. ताप, सर्दी, खोकला, अतिसार यापासून आपण मुक्त राहू शकतो. यापैकी काहीही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य सेविका अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अतिसाराची लक्षणे आढळल्यास वारंवार हात स्वच्छ धुऊन, ओआरएसचे तयार पाणी वारंवार घेतल्यास शक्तिपात होत नाही. शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते, असे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून आरोग्यसेविका सेजल कदम यांनी केंद्र शाळेतील पालक व मुलांना प्रबोधन केले. त्यांचे सोबत संजना सावंत होत्या.
यानंतर मारुती वाडीतील चार राजा मित्र मंडळातर्फे सामाजिक बांधीलकी राखताना इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेश शिरोडकर, राजेंद्र मरिये, राजेश मोरये, राजेश पावसकर, सुरेश टक्के, रुपेश नानचे, संघाचे अध्यक्ष रुपेश रेवडेकर यांचेसह मुख्याध्यापिका सृष्टी गुरव, सहशिक्षिका रंजना पाटील, वेदांती नारकर तसेच पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, मुख्याध्यापिका गुरव यांनी शाळेतील गरजू गोरगरीब मुलांना या मदतीचा नक्की उपयोग होईल, असे सांगून या स्तुत्य उपक्रमाबद्दल मंडळाचे आभार मानले.











