योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात अनेक योग प्रात्यक्षिके सादर
वैभववाडी (प्रतिनिधी) : प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे. योगा हे जणू भारताला मिळालेले मोठे वरदान आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे. जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. अर्जुन रावराणे विद्यालय व श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे आज जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी क्रीडा शिक्षक तुळसणकर एस. टी. यांनी गायत्री मंत्र व योग शिक्षक मरळकर व्ही. एस. यांनी मृत्युंजय मंत्र म्हणून योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच पतंजली योग समिती वैभववाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी योगा, प्राणायाम, व्यायामाचे दैनंदिन जीवनातील महत्व याबाबत विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक एस.बी.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तर योग शिक्षक व्ही. एस. मरळकर, क्रिडा शिक्षक एस.टी.तुळसणकर तसेच प्रशालेतील एन.सी.सी. विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनेक योग प्रात्यक्षिकांचे यावेळी सादरीकरण केले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी. एस. वैभववाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, वैभववाडी तालुका तालुका पतंजली समितीच्या महिला पदाधिकारी, योग शिक्षक एस.व्ही.मरळकर, एस.टी.तुळसणकर, एस.बी.शिंदे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











