खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सिंधुनायक चषक २०२६ भव्य क्रिक्रेट स्पर्धा

कणकवली विधानसभा मतदारसंघ भाजपा मंडलचे आयोजन

५ ते ९ एप्रिल दरम्यान नाधवडेतील महादेव मैदानात रंगणार क्रिक्रेटचा रणसंग्राम

तब्बल ५ लाख ७५ हजार ५७५रुपयांच्या प्रथम पारितोषिकासह लाखोंची बक्षिसे

टेनिस बॉल राष्ट्रीय क्रिक्रेट खेळाडूंचा स्पर्धेत समावेश

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजप कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ‘सिंधुनायक चषक २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ५ ते ९ एप्रिल या कालावधीत वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील श्री महादेव मैदान येथे करण्यात आले आहे.

पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणाऱ्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देशभरातील विविध संघ सहभागी होणार असून या संघांमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हयाबरोबर गोवा येथील क्रिकेट खेळाडूंना व क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ जवळून पाहता यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले असून प्रकाशझोतात होणाऱ्या या स्पर्धेला अनेक मंत्री, केंद्रीय मंत्री, अनेक प्रतिभावान खेळाडूंसह उद्योजक, कलाकार व अनेक मान्यवर भेट देणार आहेत.

या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम भव्यदिव्य असणार असून स्पर्धेसाठी डीजे साऊंड सिस्टीम, प्रेक्षकांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था केली जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुरु होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेसाठी नामांकित समालोचक उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५ लाख ७५ हजार ५७५ रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी २ लाख ७५ हजार ५७५ रुपये आहे. त्याखेरीज ‘मॅन ऑफ द सिरीज’साठी आकर्षक मोटरसायकल व ‘मॅन ऑफ द मॅच’ साठी विविध आकर्षक बक्षिसे व खेळाडूंसाठी विविध रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेमध्ये नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील ७५ निमंत्रित दिव्यांगांना भेटवस्तू देण्यात येणार असून, या ७५ दिव्यांगांमधील ३ दिव्यांगांना लकी ड्रॉद्वारे दिव्यांगांसाठीची मोटरसायकल भेट दिली जाणार आहे. उपस्थित प्रेक्षकांसाठी विविध बक्षिसे देण्यात येणार असून महिला व पुरुषांसाठी दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन त्यायोगे विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. शेवटच्या दिवशी उपस्थित महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉ काढून प्रथम क्रमांकांना प्रत्येकी १ इलेक्ट्रीक स्कुटर व विविध आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेला ८ व ९ रोजी अनेक सेलिब्रिटी, नामांकित खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री नीतेश यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी लागणाऱ्या व्यवस्थापनाची तयारी मोठ्या स्वरुपात सुरु आहे. भव्यदिव्य होणाऱ्या या स्पर्धेचा लाभ सिंधुदुर्ग-रत्नागिरी-कोल्हापूर जिल्हयाबरोबर गोव्यातील क्रीडाप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, बंड्या नारकर, मिलींद मेस्त्री, राजा भुजबळ, सुधीर नकाशे, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे, वैभववाडी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!