घरगुती गॅस ग्राहकांना सुरळीत गॅस पुरवठा करा ;कणकवली तहसिलदारांकडे शिष्टमंडळाची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीत काही सब वितरकांमार्फत ग्राहकांना गॅस वितरण केले जाते. मुख्य इंडेन व भारत गॅस एजन्सी कणकवली व फोंडा येथून हा घरगुती गॅस सिंलेंडरचा पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. संबंधित एजन्सीधारक काळा बाजार करुन सर्वसामान्य लोकांना घरगुती गॅसचा पुरवठा करत नाहीत. बुकींग करण्यासंदर्भात कुठल्याही योग्य सुचना मिळत नाहीत, त्यामुळे गॅस एजन्सीचे सब वितरक सिंलेडर उपलब्ध नसल्याचे सांगत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी कणकवली तहसिलदारांकडे केली आहे.
या शिष्टमंडळाने नायब तहसिलदार विजय वरक यांना घरगुती गॅस तांत्रिक तुटवड्याबाबतचे निवेदन नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते दिले. असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी चेअरमन प्रकाश परब , कोळोशी सोसायटी चेअरमन संतोष चव्हाण , कृष्णा वायंगणकर,श्री. बटवाले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या शेकडो सहीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले आहे.
नांदगाव पंचक्रोशीत गॅस सिलेंडर पुरविणारे मुख्य वितरक ग्राहकांना समाधानकारक सेवा देत नाही आहेत. सध्या इंधन तसेच गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा वितरकांच्या मनमानीमुळे कृत्रिम तुटवडा होत आहे. संबंधित वितरकांची योग्य ती चौकशी करुन कारवाई करावी. तसेच नांदगाव , असलदे , आयनल , कोळोशी , तोंडवली – बावशी यासह परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना सिलेंडरचा सुरळीत पुरवठा करुन मिळावा , अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.
वितरकांकडून ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे –
नांदगाव पंचक्रोशीतील घरगुती गॅस ग्राहक हजाराच्या घरात आहेत. या ग्राहकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने मोठी नाराजी पसरली आहे. 15 दिवस बुकींग होवून देखील गॅस मिळत नसल्याने वितरकांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना दिली जात आहेत. त्यामुळे संबंधित गॅस वितरण करणा-या व्यवस्थेची चौकशी करुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.












