कणकवलीत भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी…!
कणकवली (प्रतिनिधी) : हनुमान जयंतीनिमित्त कणकवली शहरातील बाळ गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे यंदा भक्ती, परंपरा आणि नाविन्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिरातील गाभाऱ्यात कोकणातील या सिझनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध फळांच्या आकर्षक आरासीत श्री हनुमानाची मूर्ती सजविण्यात आली होती. तर छतावर कृत्रिम गदा लावण्यात आल्या या देखण्या आणि लक्षवेधी सजावटीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
मंदिर परिसरात उभारण्यात आलेला भव्य मंडप आणि विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी ६.४५ वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळ्याने कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी पाळणा गीत गात जन्मोत्सव सोहळा दिमाखदार पार पडला. तदनंतर ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत श्रींची पूजा, अभिषेक व तीर्थप्रसाद, तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा श्री व सौ गवळी दाम्पत्याच्या हस्ते पार पडली. तर दुपारी भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. प. पू.भालचंद्र महाराज संस्थान येथे महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.
सायंकाळच्या सत्रात महिलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला रंगत आणली. भजने आणि हनुमान भक्तीगीतांनी परिसर भारावून गेला. शहरभर आणि गावोगावी हनुमानाच्या गजराने आणि भक्तीमय वातावरणाने ही जयंती साजरी करण्यात आली. काहींनी मोबाईल स्टेटस आणि भक्तीगीता मधूनही बजरंग बलीप्रती असलेली श्रद्धा व्यक्त केली. तसेच तालुक्यातील काशीविश्वेश्वर हनुमान मंदिर, जाणवली, कलमठ, वरवडे संगम,स्वयंभू मंदिर शेजारील श्रीराम मंदिर,वागदे तसेच इतर गावांमध्येही हनुमान जयंती मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी बाळ गोपाळ मित्रमंडळ व धर्मराज महाराज समाधीस्थान यांच्या वतीने सुसज्ज नीटनेटके असे नियोजन करण्यात आले होते.दरम्यान दुपारी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक इतरही लोकप्रतिनिधींनी मंदिराला भेट देत दर्शन घेतले. त्यांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
हनुमान जयंतीनिमित्त कणकवली तालुक्यात सर्वत्र जय बजरंगबली च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.












