भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून दळवींचे विशेष अभिनंदन
कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना गती देत शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना सक्षम बँकिंग सेवा पुरविण्यात जिल्हा बँकेने मोलाची भूमिका बजावली आहे. बँकेची ही झपाट्याने झालेली प्रगती ही व्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्हा बँकेने 7 हजार कोटींचा टप्पा पार करत इतिहास रचल्याचे कौतुकोद्गार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी काढले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या आर्थिक वाटचालीत महत्त्वाचा टप्पा गाठत तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचाऱ्यांचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, माजी जि.प. उपाध्यक्ष रंजित देसाई, बैंक संचालक महेश सारंग, जि.प.सदस्य गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, बंड्या नारकर, समतोष नानचे, मिलींद मेस्त्री , सुधीर आडिवरेकर, कृष्णा वायंगणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, ग्राहकांचा वाढता विश्वास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक कारभार यांच्या जोरावरच हा टप्पा गाठता आला आहे. भविष्यातही अधिक प्रगत सेवा देत जिल्ह्याच्या आर्थिक विकासात बँक पुढाकार घेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












