आंबोलीत बर्निंग कार चा थरार ; डस्टर कारला आग

सुदैवाने जीवितहानी टळली

आंबोली (प्रतिनिधी) : आंबोली घाटमार्गातील मुख्य धबधब्याजवळ आज सोमवारी दुपारी एका डस्टर कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण गाडीला वेढल्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, गाडीतील सर्व प्रवासी आधीच बाहेर उतरलेले असल्याने एक मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज येथील रहिवासी अमरनाथ अशोकराव गवळी हे आपल्या कुटुंबीयांसमवेत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. तिथून सोमवारी दुपारी आंबोली मार्गे गडहिंग्लज येथे परत येत असताना, आंबोली धबधब्याच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत त्यांनी आपली डस्टर कार (क्रमांक MH09 DM 6891) उभी केली. अमरनाथ गवळी यांच्यासह कुटुंबातील एकूण चार जण गाडीबाहेर जेवणासाठी थांबले होते.
जेवण करत असतानाच गाडीच्या समोरील बॅटरीच्या भागातून अचानक मोठा आवाज झाला आणि पाठोपाठ धूर निघू लागला. प्रसंगावधान राखून त्यांनी गाडीचे बोनेट उघडून पाणी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे बोनेट उघडले नाही आणि आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच संपूर्ण कार डोळ्यादेखत जळून खाक झाली. या घटनेनंतर अमरनाथ गवळी यांनी दुसऱ्या एका वाहनाच्या मदतीने आपल्या कुटुंबाला सुरक्षितपणे गडहिंग्लज येथे घरी रवाना केले.
घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार संतोष गलोले, हवालदार लक्ष्मण काळे आणि कॉन्स्टेबल गौरव परब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अमरनाथ गवळी यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. गाडीने तांत्रिक बिघाडामुळे स्वतःच पेट घेतल्याने आपली कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे गवळी यांनी पोलिसांना सांगितले. या अपघाताबाबत उशिरापर्यंत आंबोली पोलिसात कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती.

error: Content is protected !!