इबोलाग्रस्त संशयित रुग्ण बंगळूर मध्ये क्वारंटाईन

कणकवली (प्रतिनिधी) : जगभरात पुन्हा एकदा नव्या विषाणूने चिंता वाढवली असून काँगो आणि युगांडा येथे इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. इबोला हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून संक्रमित व्यक्तीच्या रक्त, उलटी तसेच शारीरिक द्रवांद्वारे हा विषाणू पसरत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे. इबोला विषाणूचा प्रसार इतर देशांमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने विविध देश सतर्क झाले आहेत. काँगोमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे वृत्त असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. इबोलासाठी अद्याप प्रभावी औषध किंवा लस उपलब्ध नसल्याची माहितीही समोर येत आहे. दरम्यान, भारतातही इबोलाचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. युगांडाहून परतलेल्या एका तरुणीला बंगळुरू विमानतळावर तपासणीनंतर तातडीने क्वारंटाईन करण्यात आले असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या आरोग्यावर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!