नगरसेविका राजश्री धुमाळेंच्या घरासमोरील चिखलमय रस्ता केला चकाचक
मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी घेतली दखल
कणकवली (प्रतिनिधी) : माजी नगरसेविकेच्या घरासमोरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य ही बातमी आपला सिंधुदुर्ग न्यूज ने प्रसिद्ध करताच तात्काळ या बातमीची दखल नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी घेतली आणि रस्त्यावरील संपूर्ण चिखल बाजूला करणे रस्ता चकाचक केला. माजी नगरसेविका राजश्री धुमाळे यांच्या घरासमोरील रस्त्याच्या गटारसफाईनंतर गाळयुक्त माती, कचरा रस्त्यावरच टाकण्यात आला होता. बुधवार 27 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कणकवलीत पाऊस पडला. राजश्री धुमाळे यांच्या घरासमोरील साचलेल्या कचऱ्यावर पावसाचे पाणी पडून संपूर्ण रस्ताच चिखलाने माखून गेला होता. नागरिकांना या भागातून चालणेही मुश्किल होत होते. याबाबत आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनेल ने बातमी लावताच नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी तात्काळ दखल घेतली. प्रसाद अंधारी नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी दाखल झाले. नगरपंचायत च्या माध्यमातून जेसीबी लावून रस्त्यावरील चिखल काढण्यात आला. नगरपंचायतच्या ट्रॅक्टरमधून रस्त्यावर साचलेला सगळा कचरा उचलण्यात आला. अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाण्याचा फवारा मारून रस्ता धुवून काढण्यात आला. चिखल धुवून रस्ता पूर्ववत केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.













