कोकणातील महिला बचत गटांना मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ द्या : प्रमोद जठार

केईएम परिसर ‘हेल्थ कॉरिडॉर’ म्हणून विकसित करा; महापौरांकडे निवेदन

मुंबई (प्रतिनिधी) : आमदार प्रमोद शंताराम जठार यांनी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील महिला सक्षमीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या चार अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले. या भेटीनंतर बृहन्मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून या मागण्यांची माहिती दिली.

आमदार प्रमोद जठार यांनी महापौरांकडे मांडलेले चार प्रमुख विषय खालीलप्रमाणे आहेत:

  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे टॉय ट्रेन (Mini Toy Train) सुरू करा :- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीचा बाग) पर्यटकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ‘टॉय ट्रेन’ (Mini Toy Train) सुरू करण्यात यावी, अशी लेखी विनंती माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या उद्यानात दररोज हजारो पर्यटक, विद्यार्थी आणि कुटुंबे भेट देतात, त्यामुळे येथे टॉय ट्रेन सुरू केल्यास पर्यटकांना संपूर्ण उद्यान सहज पाहता येईल, लहान मुलांसाठी मनोरंजनाची नवी सुविधा उपलब्ध होईल, पालिकेच्या महसुलात वाढ होईल आणि मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला असून, महापौरांनी या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.
  • कोकणातील महिला बचत गट व महिला संस्थांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्या – कोकणातील महिला बचत गट व महिला संस्थांनी तयार केलेल्या विविध घरगुती व पारंपरिक उत्पादनांच्या (मसाले, काजू, आंबा, फणस प्रक्रिया, कोकम, हस्तकला व इतर खाद्यपदार्थ) विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या बाजारपेठांमध्ये किंवा योग्य सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये महापौर रुग्ण सहाय्यता निधी कक्ष सुरू करा :- मुंबई व मुंबईबाहेरील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना पैशांअभावी वेळेत उपचार घेणे कठीण जात असल्याने, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये हा मदत कक्ष सुरू केल्यास गरजू रुग्णांना तत्काळ आर्थिक साहाय्य मिळून उपचार प्रक्रिया सुलभ होईल. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथम केईएम रुग्णालयात सुरू करून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर सर्व पालिका रुग्णालयांमध्ये राबवावी अशी मागणी केली आहे.
  • केईएम रुग्णालय परिसर ‘हेल्थ कॉरिडॉर’ म्हणून विकसित करण्याबाबत :- केईएम रुग्णालय परिसर ‘हेल्थ कॉरिडॉर’ म्हणून विकसित करण्याबाबत आणि पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सुधारणा करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास व्यवस्था उभारण्याबाबतचे मागणी पत्र सुपूर्द केले; या पत्राद्वारे त्यांनी केईएम, वाडिया, टाटा आणि महात्मा गांधी कामगार रुग्णालय परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ॲम्ब्युलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका तयार करणे, पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विकासकांना अतिरिक्त एफएसआय देऊन त्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज व अल्पदरातील धर्मशाळा उभारणे, तसेच संपूर्ण परिसराचा सुनियोजित विकास करणे अशा विविध मागण्या मांडल्या.

प्रमोद जठार
९८२१३२२३३२

error: Content is protected !!