नितीन राऊळ यांच्या बदनामीप्रकरणी बांदा पोलिसांत तक्रार

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टविरोधात नितीन राऊळ आक्रमक

‘पुरावे द्या, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा’ ; नितीन राऊळ यांचा इशारा

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २३ मे २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडिया ग्रुपवर श्री राऊळ यांच्याविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक संदेश प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाफोली येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत ग्रामस्थ विठ्ठल कळंगुटकर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून श्री राऊळ यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानंतर श्री. राऊळ यांनी तत्काळ सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना याबाबत माहिती दिली. प्रशासनाने कारवाई करत अवैध वाळू उत्खननात वापरण्यात येणारे डंपर व जेसीबी ताब्यात घेतले. यानंतर सोशल मीडियावर संबंधित कारवाईबाबत आक्षेप घेत, “डंपर व जेसीबी पकडून तहसीलदार यांच्या ताब्यात देणे योग्य नसून, यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईची जबाबदारी विठ्ठल कळंगुटकर व नितीन राऊळ यांनी घ्यावी,” असा मजकूर प्रसारित करण्यात आला. तसेच “इन्सुली येथे होणारा वाळू उपसा दिसत नाही का? अथवा त्यांना हप्ते मिळतात का?” असा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आपली सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत नितीन राऊळ यांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांची भेट घेत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. “संबंधितांनी सात दिवसांच्या आत पुराव्यासहित आरोप सिद्ध न केल्यास न्यायालयात धाव घेऊन अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

error: Content is protected !!