बांदा (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५जुन )तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिरे तसेच जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा व आयुष्यमान आरोग्य मंदिर बांदा-१ येथे करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत परिसर स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सावंतवाडी येथील डॉ. रमेश कर्तस्कर यांच्या हस्ते प्रत्यक्ष साफसफाई करून करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थितांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि हरित आरोग्य परिसर निर्मितीचा संकल्प केला. उद्या, दि. ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६ आयुष्यमान आरोग्य मंदिरे तसेच जिल्हा परिषद दवाखाना रोणापाल येथे औषधी वनस्पती, फळझाडे व सावली देणाऱ्या देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनाबरोबरच आरोग्य संस्थांचे परिसर अधिक स्वच्छ, हिरवेगार व आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सावंतवाडी यांच्याकडून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शंकर परब, आरोग्य सहाय्यक, सावंतवाडी यांनी केले. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.












