५० झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत वरवडे यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना हिरवाईचा वारसा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध विभागांतील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमासाठी पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जि प सदस्य सुप्रिया मेस्त्री, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, प्रमोद ठाकूर, उपअभियंता घेवाडे तसेच कनिष्ठ अभियंता अमित सावंत आणि विस्तार अधिकारी विशाल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करताना पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी वरवडे गाव परिसरात आणि ग्रामपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी सुमारे ५० झाडांची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली असून प्रत्येक झाड जगविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षक नसून मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. वाढते तापमान, बदलते हवामान आणि कमी होत चाललेली वनसंपदा यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. सरपंच करुणा घाडीगावकर, उपसरपंच मनोज बोंद्रे, प्रवीण घाडी, प्रदीप कदम, कारले तसेच मानसी मेस्त्री, वर्षा मेस्त्री, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वरवडे गावाने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, “एक झाड लावा आणि ते जगवा” हा संदेश सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. गावाच्या हिरवाईत भर घालणारा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
















