धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक विशेष नाट्यप्रयोग, होम मिनिस्टर तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल-खासकिलवाडी येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या आयोजनातून विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक तसेच सामाजिक उपक्रमांनी नटलेला हा नवरात्रोत्सव १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवीची विधिवत प्रतिष्ठापना, आरती, तीर्थप्रसाद, भजन, महाप्रसाद, विविध स्पर्धा तसेच विशेष नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाची सुरुवात १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापनेने होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ८ वाजता बुवा अमित मेस्त्री यांच्या भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. भक्तिमय वातावरणात देवीच्या आराधनेसोबत भाविकांना दर्जेदार भजनाचा आनंद घेता येणार आहे.
१७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता भंडारा अर्थात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हळदी-कुंकू समारंभ होणार असून, सायंकाळी ८ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता भजन जुगलबंदी सामना विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमात आई मोई प्रसादिक भजन मंडळ, बोईडे-कणकवलीचे बुवा मकरंद मोडक तसेच लिंग पांडवदेवी प्रसादिक भजन मंडळ, दारिस्ते-कणकवलीचे बुवा स्वप्नील शंकर गोसावी सहभागी होणार आहेत. विविध वाद्यांच्या साथीने रंगणाऱ्या या भजन जुगलबंदीमुळे रसिकांना भक्तिसंगीताची मेजवानी मिळणार आहे.
१८ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवात मनोरंजन आणि कौटुंबिक कार्यक्रमांची रंगत वाढणार आहे. यावेळी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ७ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. यामध्ये महिलांसाठी पैठणी तसेच आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणार आहे. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ मनोहर डांगे करणार आहेत. त्यामुळे महिलांसह कुटुंबीयांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
१९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता नवरात्रोत्सवाची सांगता विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. खांनोलीकर दशावतार नाट्य मंडळ, खांनोली निर्मित व बाबा मेस्त्री संचालित ‘कुलवंतांची सून’ हे ‘दशावतारी नाटक’ सादर करण्यात येणार आहे. दशावतारी कलेची परंपरा जपणाऱ्या या नाट्यप्रयोगामुळे परिसरातील नाट्यरसिकांना खास पर्वणी मिळणार आहे.
या संपूर्ण नवरात्रोत्सवासाठी संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून, परिसरातील भाविक, महिला, युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते’ या मंगलमय जयघोषात शिवरवळ-खासकिलवाडी परिसरात नवरात्रोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे.











