गवळीटेंब ग्रामस्थांचे श्रमदानातून जलसंधारण

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सजग नागरिकांचा स्तुत्य उपक्रम

नाना पाटेकर यांच्या कार्याला श्रमदानातून श्रद्धांजली…!

बांदा (प्रतिनिधी) : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बांदा येथील गवळीटेंब परिसरातील सजग नागरिकांनी एकत्र येत श्रमदानातून येथील ओहोळावर कच्चा बंधारा बांधला. यात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. गावातील पाणी उपलब्धता वाढविण्यासोबतच पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून ठेवणे, भूजलपातळी वाढविणे तसेच आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी कोणत्याही शासकीय मदतीची प्रतीक्षा न करता जबाबदार नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.

कमी पाऊस आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या स्थानिक जलसंधारणाच्या उपाययोजना जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. गवळीटेंब येथील नागरिकांनी दाखविलेला हा सामूहिक सहभाग आदर्श व प्रेरणादायी ठरणारा आहे.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम केले. यावेळी ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून महाराष्ट्रात निस्वार्थीपणे काम केलेल्या नाना पाटेकर यांच्या योगदानाची आठवण ठेवत गवळीटेंब ग्रामस्थांतर्फे प्रत्यक्ष श्रमदानातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी कृष्णा देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, गुरु कल्याणकर, विराज देसाई, प्रितेश सावंत, अभि देसाई, सगुण शेटकर, महादेव आईर, मकरंद वराडकर, सलिल वळंजू, वैदेही देसाई, व्यंकटेश उरूमकर, पवन आईर, अमोल सावंत, धर्मा आदी ग्रामस्थांनी श्रमदान केले.

error: Content is protected !!