शासनाची करचुकवेगिरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला पाठीशी का घातले जातेय ?
कणकवली (प्रतिनिधी) : भारतात सर्वात जास्त खाजगी वाहन खरेदी केली जाते. आणि या खाजगी वाहनांची आरटीओ कडे होणाऱ्या नोंदणीतून राज्य आणि केंद्र सरकारला कर रुपात महसूल मिळतो. मात्र आरटीओ कडे स्वतःच्या वॅगणार कार ची नोंदणी न करताच आपल्या परिचिताच्या वॅगणार कार चा MH 07 AG 8533 हा नंबर स्वतःच्या कारला वापरून शासनाचा कर चुकवून शासनाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या त्या प्राथमिक शिक्षकावर कणकवली पोलिसांनी कायदेशीर गुन्हा का दाखल केला नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत पेशाने प्राथमिक शिक्षक असलेल्या विनोद खंडागळे नामक शिक्षकाने डुप्लिकेट नंबर प्लेट वापरून स्वतःची वॅगणार कार वापरल्याचे कणकवली शहरात 19 जून रोजी रात्री उघड झाले. कणकवली तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या सत्यवान माळवे या अधिकाऱ्याच्या वॅगणार कार चीच नंबर प्लेट प्राथमिक शिक्षक असलेले विनोद खंडागळे स्वतःच्या वॅगणार कारला वापरत होते. याची पोलखोल 19 जून रोजी कणकवली पोलिसांनी केली. त्यानंतर शुक्रवार 20 जून रोजी MH 07 AG 8533 ह्या एकाच नंबरच्या सफेद रंगाच्या दोन्ही कार कणकवली पोलीस ठाण्यात आणल्या गेल्या. कणकवली पोलिसांनी आरटीओ कडे याबाबत माहिती दिली.नंतर सायंकाळी मोटर वाहन निरीक्षक अतुल चव्हाण हे कणकवली पोलीस ठाण्यात आले व त्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली. तेव्हा सत्यवान माळवे यांच्या वॅगणार कारची नोंदणी आरटीओ ऑफिसमध्ये झाली असून त्याच वाहन क्रमांक MH07AG8533 असल्याचे सिद्ध झाले. तर विनोद खंडागळे यांच्या वॅगणार कार ची नोंदणीच आरटीओ कडे झाली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून विनोद खंडागळे याना विना रजिस्ट्रेशन कार वापरल्याबद्दल 10 हजार रक्कम दंड आरटीओ निरीक्षकांनी केला. आरटीओ कडून झालेला दंड ही एक बाजू झाली. मात्र दुसऱ्याच्या कार चा नंबर स्वतःच्या कारला वापरून ती कार रस्त्यावर चालवणे हा दखलपात्र गुन्हा नाही काय ? मोटर व्हेईकल ऍक्ट तसेच भारतीय न्यायसंहिते नुसार प्राथमिक शिक्षक विनोद खंडागळे यांनी ही केलेली फसवणूकच होत नाही काय ? दुसऱ्याच्या कारचा नंबर स्वतःच्या कारला वापरणे हे बनावटीकरण नाही काय ? या बाबींकडे कणकवली पोलिसांनी दुर्लक्ष का केले ? केवळ आरटीओ ला समान नंबर च्या कार आढळून आल्या म्हणून आपला अहवाल देऊन पोलिसांना आपले हात झटकता येतील काय ? ड्युप्लिकेट नंबर आपल्या कारला लावून ती कार वापरण्यात खंडागळे यांचा उद्देश काय ? या प्रश्नांकडे पोलिसांनी का दुर्लक्ष केले ? की हा दखलपात्र गुन्हा आहे हे सगळे माहीत असूनही पोलीस दुर्लक्ष करत आहेत ? याची उत्तरे कणकवली पोलिसांना द्यावीच लागतील.











