खारेपाटण येथे जल पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा पुढाकार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील बारमाही वाहणाऱ्या शुक नदीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जल पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने या भागाचा लवकरच विकास करण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण गावचे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण या गावातून बारमाही वाहणाऱ्या शुक नदीवर जलपर्यटन (Water Tourisam) प्रकल्प सुरू करण्याबाबत रामकांत राऊत यांनी नुकतीच नामदार मितेश राणे यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेत खारेपाटणचा जलपर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर हे देखील उपस्थित होते. या मागणीची गंभीर दखल घेत नामदार नितेश राणे यांनी तातडीने संबंधित विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार नुकतेच एक संबंधित विभागाचे पथक सर्व्हे करण्यासाठी खारेपाटण येथे स्थळ पाहणी करण्या करीता आले होते.

कार्यकारी अभियंता सुधीर देवरे, उपअभियंता राजू झपाटे, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे सहाय्यक अभियंता प्रवीण शिंदे आदी अधिकारी वर्ग यावेळीं उपस्थित होते तर खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, माजी सरपंच रामकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लाड आदी प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. खारेपाटण येथील शुक नदी परिसर व मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर आजही उभा असलेला ब्रिटिशकालीन जुना पूल याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली तर जल पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर या भागाचा विकास करावयाचा झाल्यास येथील शुक नदी परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनासाठी आलेली क्षमता, तसेच बोटिंग, शिकारा राईड, क्याकिंग, नदी सफारी यांसारखे उपक्रम राबविण्याच्या शक्यता यांचा प्राथमिक आढावा यावेळी घेण्यात आला. या बरोबरच नदीकाठ सुशोभीकरण, वॉकवे,आकर्षक लाइटिंग,पर्यटकांसाठी सुविधा केंद्र तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींचा देखील यावेळी विचार करण्यात आला. खारेपाटण शुक नदीवर जल पर्यटनाच्या दृष्टीने पाहणी करण्याकरिता आलेल्या संबधीत अधिकाऱ्यांनी या भागाची संपूर्ण पाहणी करून स्थळ पाहणीचा अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्यात येणार असून या प्रकल्पास गती देण्यासाठी आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यासाठी तो उचित कार्यवाही साठी पुढे पाठवण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने जल पर्यटनाच्या माध्यमातून खारेपाटण परिसराच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक युवकाना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी रामकांत राऊत यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!