खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच अवैध कत्तल व कत्तल कारखान्यावर कठोर करवाई करण्याचे आदेश शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केल्यानंतर तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे शासनाच्या वतीने गोवंश तस्करी रोखण्याबाबत पथक कार्यरत करण्यात आले असून जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनाची कडक तपासणी केली जात आहे. खारेपाटण चेक पोस्ट येथे गेल्या दोन दिवसापासून हे पथक तैनात करण्यात आले असून या गोवंश तस्करी पथकात खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, ग्राम महसूल अधिकारी तथा खारेपाटण तलाठी प्रवीण लुडबे, पशुधन पर्यवेशक कुरंगवणेच्या सारिका दहिफळे यांचा समावेश आहे.तर सुमारे २४ तास हे पथक खारेपाटण चेकपोस्ट येथे कार्यरत राहणार आहे. दि.२५ मे २०२६ पासून कार्यरत असलेले हे गोवंश तस्करी पथक शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे समजते.

खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैध रित्या होणाऱ्या गुरांची वाहतूक रोखण्यासाठी तैनात असलेले गोवंश तस्करी पथक वाहनाची तपासणी करताना.











