वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह वेंगुर्त्यात होणाऱ्या बोगस खत विक्री, पुरवठा व वाहतुक याला प्रतिबंध करण्याकरीता सद्या कृषी विभागाची भरारी पथके कार्यरत आहेत. वेंगुर्ले शिरोडा दरम्यान पथक जात असता त्यांना उभादांडा वरचेमाड येथे रस्त्याच्या बाजूला एक खताचा टेम्पो संशयितरित्या दिसून आला. त्या गाडीची तपासणी केली असता टेम्पो मध्ये विनापरवाना खत वाहतूक आढळून आले. त्यामुळे टेम्पो पकडून पंचनामा करून वेंगुर्ले पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने पोलिसांनी टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
काल प्रकाश मोहीते (कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला), जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले, सहाय्यक कृषी अधिकारी, जीवन परब कृषिसेवक, ज्ञानेश्वर सोनटक्के, वरचेमाड पोलीस पाटील अनुप नार्वेकर, वेंगुर्ले पोलीस अंमलदार योगेश सराफदार आदी जिल्हास्तरीय भरारी पथक वेंगुर्ला ते शिरोडा असे खाजगी वाहनाने गस्त करीत होते. या दरम्यान दुपारी ३.४५ वा. च्या सुमारास त्यांना उभादांडा, वरचेमाड येथे संशयितरित्या टेम्पो दिसून आला. पाहणी आणि चौकशी केली असता त्यातून विनापरवाना सेंद्रिय खताची वाहतूक होत असल्याचे समोर आले. त्यामुळे वाहन ताब्यात घेत एकावर वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेंगुर्ला ते शिरोडा जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला टाटा कंपनीचा १८१६ मॉडेल असणारे सहा चाकी वाहन / (टेम्पो नंबर एमएच ०८ बी के ०५८६) हे शिरोड्याच्या दिशेने तोंड करून थांबलेले दिसुन आले. त्या वाहनाचे मागील हौदयामध्ये खताच्या गोण्या असल्याचे दिसुन आल्या. सदर ट्रकमध्ये असलेल्या खतांच्या गोण्याबाबत खात्री केली असता, हे खत मेंगलोर कर्नाटक येथुन वेंगुर्ला येथे आणले असल्याचे चालकाने सांगितले. तसेच काही ठिकाणी त्या खताची विक्री केलेली असल्याचे सांगीतले. त्याने त्याचे ई-वे बील दाखवुन इतर कोणताही परवाना किंवा बील आपल्याजवळ नाही तसेच त्या गोण्यांबाबत अधिक काही माहीती नसल्याचे सांगीतले. दरम्यान पंचासमवेत ट्रकमधील खताच्या गोण्याची खात्री केली असता, त्यामध्ये विनापरवाना सेंद्रीय खत दिसुन आले.
त्यामुळे राहुल राजु माने (मोहीम अधिकारी तथा जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख जि.प. सिंधुदुर्ग) यांना त्या ठिकाणी बोलावुन घेतले. यावेळी १९ हजार ५०० रुपये किमतीचे VFF VIJAYA ORGANIC FISH MANURE -NEEM CAKE MIXTURE D.No. 7/54, THARIMUND BADA UCHILA-574117, UDUPI DIST असे लेबल असलेल्या पांढऱ्या रंगाच्या एकुण ३० गोण्या (प्रत्येकी वजन ५० KG एकुण वजन १५०० KG व प्रत्येकी रक्कम ६५० रु.) आढळून आल्या आहेत. या विनापरवाना खत बाबत पंचनामा करण्यात आला असून संबंधित वाहन पुढील कार्यवाहीसाठी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद प्रकाश मोहिते (कृषी अधिकारी वेंगुर्ला) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिली असून चालक मारुती शिवाजी कदम (वय ४१ रा. मु.पो. तेलीवाडी, ता. लांजा, जि. सिंधुदुर्ग) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान ट्रक मालक फकीर महंमद नेवरेकर (रा. लांजा) असल्याचे चालकाने सांगितले आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश राऊळ हे अधिक तपास करीत आहेत.









