पावसाळी नियोजनासाठी नितीन राऊळ यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली जिल्हा परिषद क्षेत्रातील सात गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय, बांदा-२ येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पावसाळी नियोजन, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच संभाव्य अडचणींवर उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस महावितरणचे सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे, बांदा-२ चे कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर तसेच विविध गावांतील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितीन राऊळ यांनी इन्सुली व परिसरातील गावांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याबाबत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत सविस्तर माहिती घेतली.

आरोस फिडरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पंचक्रोशीतील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित होतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पावसाळ्यात इन्सुलेटर गरम होऊन फुटण्याचे प्रकार वाढत असल्याने आवश्यक प्रमाणात इन्सुलेटर उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. वादळी वाऱ्यामुळे ११ केव्हीचे विद्युत खांब कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे लोखंडी विद्युत खांब सबस्टेशन स्तरावर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय जीर्ण झालेल्या विद्युत खांबांच्या बदलासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध व्हावा यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांनी दोन ते तीन दिवसांत आवश्यक विद्युत खांब उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिले. पावसाळ्यात शक्यतो विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी बांदा-२ चे कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांनी वायरमन व लाईनमन यांची बैठक घेऊन प्रत्येक गावाचा स्वतंत्र आढावा घ्यावा तसेच आवश्यक साहित्याबाबत लेखी अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीस कास गावचे सरपंच प्रवीण पंडित, निगुडेचे माजी सरपंच गुरुदास गवंडे, सामाजिक कार्यकर्ते सलील देसाई, सागर राणे आदी उपस्थित होते. दरम्यान, मार्च महिन्यातच जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी महावितरणला पत्र देऊन पावसाळी नियोजन करण्याची मागणी केली होती. त्या पत्राची दखल घेत ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बांदा येथे आयोजित आढावा बैठकीत महावितरणचे कुडाळ कार्यकारी अभियंता श्री वनमोरे यांच्याशी चर्चा करताना जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, कास सरपंच प्रवीण पंडित.

error: Content is protected !!