शैक्षणिक सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सखाराम शिवराम तथा एस. एस. मुंबरकर यांचे वैद्यकीय उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. करारी बाण्याचे एक भारदस्त व्यक्तिमत्व, समाजातील शेवटच्या माणसाचे जीवन जाणणारा, मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व हरपले आहे. मुंबई महानगरपालिकेतून वर्ग 1 अधिकारी पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. कोकणात आदर्शवत असा ठसा उमठवून, समाजाला दिशा दिशा देणारा हिरा काळाच्या पडद्याआड निघून गेला आहे. सन ९० च्या दशकात बौद्ध समाजाच्या अनेक मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातन भूतो न भविष्यती असा प्रचंड मोठा मोर्चा निघाला होता. त्याकरिता आदरणीय एस. एस. मुंबरकर यांचे फार मोठे योगदान होते. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई (कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभाग) या संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी (सन २००५) कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी समाजबांधवांना उद्बोधित केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील आंबेडकरी चळवळीत तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. गोवा राज्यातही त्यांनी महिलांकरिता तोरसे पेडणे येथे प्रगती बी. एड कॉलेज सुरू करून महिलांना आर्थिक सक्षम केले. एस. एस.मुंबरकर मास्तर यांच्या जाण्याने आंबेडकरी विचारांच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.

मुंबरकर











