पोलिसांनी आवळली गचांडी ; एन. डी. पी. एस नुसार गुन्हा दाखल
देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गांजा लागवडीविरोधातील ही पहिली मोठी कारवाई मानली जात असून, देवगड पोलिसांनी कोटकामते येथील आडीवरेवाडीत धडक कारवाई करत ४९ हजार रुपये किमतीची २३ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. दि. २९ मे २०२६ रोजी कोटकामते, आडीवरेवाडी (ता. देवगड) येथे गांजा पिकाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. ही माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली घनश्याम आढाव यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकामध्ये सपोनि. एस. एस. बंगडे, पोहेकॉ. एम. व्ही. महाडीक, पोहेकॉ. जी. एम. गावडे, पोकों. पी. ए. आचरेकर व पोकों. आर. पी. महाले यांचा समावेश होता. पुढील कार्यवाहीसाठी दोन शासकीय पंच, कृषी अधिकारी, फोटोग्राफर, वजनकाटा धारक तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा केला असता राहत्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. या कारवाईत ३ ते ५ फूट उंचीची, ताजी, ओलसर, हिरव्या रंगाची व उग्र वासाची एकूण २३ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या झाडांचे एकूण वजन २ किलो ४५० ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत ४९ हजार रुपये आहे. या प्रकरणी ओंकार राजाराम कोतेकर (वय ३०, रा. कोटकामते, आडीवरेवाडी, ता. देवगड) याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०२६ अन्वये एनडीपीएस अक्ट १९८५ च्या कलम ८ (क) व २० (ब) (२) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोहेकॉ. महेंद्र विश्वनाथ महाडीक (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे. कारवाईदरम्यान आरोपीने आपल्या राहत्या घराच्या कंपाऊंडमध्ये गांजा पिकाची लागवड केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम बुवा करीत आहेत. देवगड तालुक्यात गांजाच्या लागवडीविरोधात झालेली ही पहिली मोठी कारवाई असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.













