चॅम्पियन मंथन उकर्डेच्या पाठीवर खा. नारायण राणेंची कौतुकाची थाप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील 12 वर्षाच्या मंथन पराग उकर्डे या सुपुत्राने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले असून, आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या चायना हाँगकाँग येथील पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत प्रत्येक गटाकरिता संपूर्ण देशभरातून दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी मंथन याचा सत्कार करत त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच पुढे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये देखील सहभागी होण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. तसेच याकरिता कोणतीही मदत लागली तर सांग मी तुझ्या पाठीशी आहे असा शब्द देखील नारायण राणे यांनी उकर्डे कुटुंबीयांना दिला. या स्पर्धेकरिता 12 वर्षीय वयोगटामध्ये कणकवली तालुक्याचा सुपुत्र मंथन उकर्डे याची निवड करण्यात आली. मंथन यांने हाँगकाँग येथे झालेल्या या आशियाई स्पर्धेमध्ये सहावे स्थान प्राप्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्या व त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ही गौरवास्पद बाब आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे विशेष कौतुक केले जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मंथन उकर्डे याला या हाँगकाँग येथील स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आर्थिक मदत करत त्याला प्रोत्साहन दिले होते. आज कणकवलीत ओम गणेश या निवासस्थानी नारायण राणे यांची भेट घेत असताना मंथन याच्यासोबत त्याची आई व आजी व भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

error: Content is protected !!