ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे यासाठी प्राधान्याने कार्य करणार-डॉ. के आर. चव्हाण
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ. के. आर. चव्हाण यांनी दिनांक २ जून २०२६ रोजी पदभार स्वीकारला. डॉ. चव्हाण यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अध्यापन, संशोधन व प्रशासकीय अनुभव आहे. ते यापूर्वी श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा येथे उपप्राचार्य, अर्थशास्त्र विभागप्रमुख तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) समन्वयक म्हणून कार्यरत होते. डॉ. चव्हाण हे मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य असून विविध स्वायत्त महाविद्यालयांच्या शैक्षणिक मंडळांवरही त्यांनी काम केले आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर लेख सादर केले असून विविध शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून योगदान दिले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. चव्हाण यांनी संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणे, विद्यार्थी प्रवेश वाढविणे, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना देणे, उद्योग-संस्था समन्वय वाढविणे, संशोधन संस्कृती बळकट करणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे यासाठी प्राधान्याने कार्य करणार असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












