भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांची बोचरी टीका
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी “स्वतःच्या वडिलांचा म्हणजेच श्रीधर नाईक यांचा स्वाभिमान ” राणे कुटुंबियांच्या पदरी गहाण ठेवून निवडणूक लढवली येथेच नाईक कुटुंबीयांचा नैतिक पराभव झालेला आहे. स्वतःच्या जीवावर निवडून आलो असे म्हणणाऱ्या सुशांत नाईक यांनी निवडणूक काळात आमदार निलेश राणे यांच्या स्वागताची वक्तव्य तपासून पहावीत. याच सुशांत नाईक यांनी आमदार निलेश राणे यांचे शहर विकास आघाडीत स्वागत केले होते. त्यांच्या बैठकाणी मांडीला मांडी लावून बसले आणि प्लानिंग केले. भावनेच्या आधारावर आजपर्यंत कणकवलीकरांना अनेक वेळा नाईक कुटुंबीयांनी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. राणे कुटुंबीयांवर आरोप करून स्वतःकडे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच राणे कुटुंबीयांच्या जीवावर स्वतः सुशांत नाईक आणि त्यांचा भाऊ संकेत नाईक हे निवडून आले आहेत हे त्रिवार सत्य आहे आणि स्वार्थासाठी, सत्तेसाठी नाईक हे कोणासमोरही नतमस्तक होतात हा त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. स्वार्थासाठी भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवणाऱ्या नाईक कुटुंबीयांची नैतिकता संपली आहे. आणि म्हणूनच माजी आमदार वैभव नाईक ज्या पद्धतीने बोलले त्याच पद्धतीने राजीनामा देणे हा एकमेव पर्याय सुशांत नाईक यांच्या समोर आहे. राजीनामा देऊन जनतेसमोर जावे.












