वैभववाडी (प्रतिनिधी) : आई व पत्नीला गंभीर मारहाण करणाऱ्या सडूरे येथील एका तरुणाविरुद्ध वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर दशरथ सुतार (वय ४०, रा. सडूरे गावठाणवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी मयुरी मयूर सुतार (वय ३८, रा. सडूरे गावठाणवाडी) यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी रात्री मयुरी सुतार यांच्या मोबाईलवर त्यांच्या भावाचा फोन आला होता. त्या भावाशी बोलत असताना, “तुझ्या भावाने माझी विचारपूस का केली नाही?” या कारणावरून मयूर सुतार यांनी पत्नीशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या प्रकारानंतर मयुरी सुतार यांनी रात्री ११२ क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत वैभववाडी पोलिसांनी सडूरे गावठाणवाडी येथे जाऊन दोघांनाही समज देत शांत केले व सकाळी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले.मात्र, बुधवारी सकाळी मयुरी सुतार या कामासाठी घराबाहेर पडत असताना मयूर सुतार यांनी पुन्हा शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मयुरी यांना सोडविण्यासाठी मयूर यांची आई प्रफुल्लता सुतार पुढे आल्या. त्यावेळी आरोपीने चिवा काठीच्या बांबूने पत्नी व आई या दोघींनाही मारहाण केली. या मारहाणीत दोघी गंभीर जखमी झाल्या.
जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयुरी सुतार यांच्या फिर्यादीवरून वैभववाडी पोलिसांनी मयूर दशरथ सुतार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.












