तरंदळे फाटा ओव्हरब्रिज परिसर जलमय; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरीक व वाहनचालकांना

कणकवली (प्रतिनिधी) : आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली-तरंदळे फाटा ओव्हरब्रिजच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडलगतची गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचले आणि काही वेळातच या परिसराला नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्दाफाश झाला आहे.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. पाण्याखाली रस्त्याची स्थिती दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. अनेक वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली.

विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटारे स्वच्छ करणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत ठेवणे ही संबंधित यंत्रणांची मूलभूत जबाबदारी असताना याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. दरवर्षी याच ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही बाब संतापजनक आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना पहिल्याच जोरदार पावसात तरंदळे फाटा परिसराची ही अवस्था असेल, तर पुढील काळात परिस्थिती किती गंभीर होईल याची चिंता व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने गटारांची साफसफाई करून कायमस्वरूपी समस्या दुर करावी अशी जोरदार मागणी होत आहे.

error: Content is protected !!