कट्टा ते सुकळवाड या भागात राबविली स्वच्छता मोहीम
चौके (प्रतिनिधी) : समाजसेवेचे व्रत घेऊन सुरू केलेल्या सेवास्पर्श फाउंडेशनने माझा कचरा, माझी जबाबदारी हा समाजासाठी गरजेचा असलेला उपक्रम हाती घेतला होता. कारण सध्या कचरा निर्मूलन हा फार मोठा यक्ष प्रश्न समाजात निर्माण झाला आहे. जिकडे पाहावे तिकडे कचऱ्याचे ढीग दिसून येतात. याची विल्हेवाट लावणार कोण ? याच हेतूने मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील उद्योजक व सेवास्पर्श फाउंडेशनचे सक्रिय सभासद केशव उर्फ आप्पा भिसे यांनी मालवण कसाल हमरस्त्यावर कट्टा ते सुकळवाड या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशी संकल्पना फाउंडेशनसमोर मांडली. सर्वांनी हा समाजोपयोगी उपक्रम असून आपण तो निश्चितच राबवू असे ठरविले आणि सेवास्पर्श फाउंडेशनचे पंचक्रोशीतील सर्व सभासद आज ३१ मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी जोरदार कामाला लागले. दुपारी सुमारे 12.30 पर्यंत सर्व सभासद व नागरिकांना एकत्र येऊन हाती घेतलेली ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली. यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, उद्योजक देवेन ढोलम, वराड सरपंच शलाका रावले, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, चौके येथील उद्योजक बिजेंद्र गावडे, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे यांनी सहकार्य केले.
आजुबाजूच्या प्रत्येक गावात, तर पर्यायाने तालुका व जिल्हा पातळीवर हा उपक्रम राबविण्यात यावा जेणेकरून आपला सिंधुदुर्ग जिल्हा निश्चितच प्लास्टिक कचरा मुक्त होईल. ह्या उपक्रमाचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
सेवास्पर्शच्या सर्व सहकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी बहुमोल सहकार्य करत कट्टा बाजारपेठ ते सुकळवाड वरचा नाका या रस्त्याच्या दुतर्फा असलेला बऱ्याच प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली. साफसफाई मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. विशेष म्हणजे महिला वर्ग व लहान मुलांनी देखील ह्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. कडक उन्हाची तमा न बाळगता सर्वांनी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सहकार्य केले. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात कचरा होता. आपण सर्वांनी पर्यावरण प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला व प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली ह्याचे समाधान प्रत्येक सभासद व सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी सर्वांनी मिळून सेवास्पर्श फाऊंडेशनचे पुढील उपक्रम सुद्धा अशा प्रकारे यशस्वी करूयात असे सर्वानुमते ठरविण्यात आले.













