नाधवडे येथे अपघातग्रस्त ईर्टीका गाडीतून गोवा बनावटीची दारू जप्त

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे-शेर्पे फाटा येथे अपघातग्रस्त अवस्थेत आढळलेल्या ईर्टीका कारमधून गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे ५० हजार ४०० रुपयांची दारू व ९ लाख रुपयांची कार असा एकूण ९ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सहायक पोलीस निरीक्षक भोसले व त्यांचे सहकारी तरेळे मार्गे वैभववाडीकडे पेट्रोलिंग करत असताना नाधवडे-शिडवणे फाटा येथे रस्त्यालगत झाडाला धडकून अपघातग्रस्त झालेली ईरटीका कार आढळली. चौकशीदरम्यान कारमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे ३० बॉक्स सापडले.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाणेचे पोलीस संदीप कांबळे व हरीश जायभाय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार व दारूचा साठा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला.

याप्रकरणी सुदर्शन राजेंद्र गीते (वय २५) व सूरज सतीश लोंढे (वय २६, दोघे रा. शिरूर घाट, बीड) यांच्याविरुद्ध अवैधरित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल कनाके यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.

error: Content is protected !!