वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; वारगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : वारगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “एक वृक्ष, हजारो श्वास” या संकल्पनेला साकार रूप देत गावातील विविध स्तरांतील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी वारगावचे सरपंच नाना शेट्ये, तलाठी भाऊ, ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे, जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार, ग्राम व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास तळेकर, वारगाव नं. २ शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण, मुख्याध्यापिका सौ. तळगावकर, समिधा शेट्ये मॅडम यांच्यासह ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद करताना प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवरील ताण लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणाच्या विविध घोषणा देत परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प केला. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्याची चळवळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वारगावमध्ये राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून, गावकऱ्यांनीही वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.

error: Content is protected !!